ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - गेट वे ऑफ इंडियाजवळच्या "ताज महाल पॅलेस" हॉटेलच्या बिल्डिंगला "ट्रेडमार्क"चा दर्जा मिळाला आहे. न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूंच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल पॅलेसही जाऊन बसला आहे. 114 वर्षं जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील एकमेव वास्तू आहे. एखाद्या ब्रँडचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे ब-याचदा ट्रेडमार्क होत असतात. भारतात ट्रेडमार्क अॅक्ट 1999पासून लागू करण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस या हॉटेलच्या बिल्डिंगला ट्रेडमार्कचा दर्जा देण्यात आला आहे. ताज महाल पॅलेस हॉटेलमधल्या वास्तूरचनेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही ट्रेडमार्कचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केल्याचंही ताजमहाल पॅलेस चालवणाऱ्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे जनरल काऊन्सिल राजेंद्र मिश्रा म्हणाले आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या महसुलात ताज महाल हॉटेलचं योगदान मोलाचे असल्याचंही मिश्रा यांनी सांगितलं आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे 1903मध्ये ताज महाल पॅलेसची निर्मिती झाली. बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्या कंपनीने ही ताज महाल हॉटेलची बिल्डिंग बांधली. ट्रेडमार्कचा दर्जा मिळाल्यामुळे आता कोणालाही ताज महाल पॅलेस हॉटेलच्या छायाचित्राचा व्यावसायिक फायद्याच्या जाहिरातीसाठी वापर करता येणार नाही, जर असे कोणी केल्यास कंपनीला शुल्क द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत अनेक दुकानांमध्ये ताज महालचे छायाचित्र असलेल्या फोटो फ्रेम्स, कफलिंक्स मिळतात. मात्र आता त्यांना त्या विकता येणार नाहीत.
देशातल्या पहिल्या ट्रेडमार्कचा दर्जा मुंबईतल्या ताज महाल पॅलेसला
By admin | Published: June 21, 2017 6:37 PM