पक्षविरोधी निर्णय घेणाऱ्या अजित पवारांवर कारवाई करा : मोहिते पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:05 PM2020-01-13T12:05:55+5:302020-01-13T12:07:01+5:30
अजित पवार यांच्यावर कारवाईची निश्चिती करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिस्तपालन समितीची स्थापन कऱण्यात आली होती. ही समिती पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर कारवाईची निश्चिती करणार होती.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाविरोधी भूमिका घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यानंतर देखील पक्षाकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आले. मात्र आता अजित पवारांच्या त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनाही मुभा द्यावी अन्यथा अजित पवारांवर कारवाई करावी, अशी मागणी जयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपला साथ दिली होती. या निलंबनावरून मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई करा, मगच आम्हाला निलंबित करा, असा पावित्रा जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतला आहे.
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना अचानक भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यात अपयश येणार असं दिसताच अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतले होते. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीत पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली.
दरम्यान अजित पवार यांच्यावर कारवाईची निश्चिती करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिस्तपालन समितीची स्थापन कऱण्यात आली होती. ही समिती पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर कारवाईची निश्चिती करणार होती. या समितीच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. आता स्थानिक नेत्यांकडून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.