ठाणे : आदिवासी कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले आद्य पुरूष रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींची जयंती राज्यात सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासकीय अध्यादेश असतांनाही त्याचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी यांनी केली आहे. ते वाल्हे, येथील संजीवन समाधी स्थळी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त आयोजित कोळी समाजाच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.ते म्हणाले की, राज्यातील खऱ्या आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांना बोगस ठरविणारे आदिवासींचे तथाकथित नेते मधुकर पिचड यांनी तमाम आदिवासी बांधवांना उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचा शाप लागल्याने पिचडांचे जातप्रमाणपत्र बोगस ठरले. न्यायालयाने जो न्याय पिचडांना दिला तोच न्याय तमाम आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांनाही द्यावा, जात पडताळणी समितीने जे निकष मधुकर पिचडांना लावले तेच निकष आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांना लावावे. तसेच मधुकर पिचडांची पेन्शन तातडीने थांबवून त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड याचीदेखील आमदारकी रद्द करावी. याप्रसंगी कार्यक्रमाला वाल्हे गावचे सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपटराव पवार, पीडीसीसी बँक पुण्याचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, तात्यासाहेब वांभिरे, तसेच महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, मराठवाडा प्रमुख सिद्धेश्वर कोळी, सुधाकर सुसलादी, महेंद्र कोळी, अनिल कोळी, दीपक भोईर, शाहीर अर्जुन अटाळीकर, किशोर पाटील, पी. व्हाय. कोळी, भारती कोळी, डी.एम. कोळी, समीर सागर, श्री. एकवीरा देवस्थान ट्रस्टचे संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विलास कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंती व मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष अरविंद चिव्हे, प्रल्हाद कदम, मल्हारी माने, अतुल चिव्हेंनी परिश्रम केले.(वार्ताहर)> महादेव कोळी प्रमाणपत्राबाबत होणार बैठकराज्याचे जलसंपदामंत्री विजय बापू शिवतारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जातप्रमाणपत्राबाबात महिन्याभरात आदिवासी विकास मंत्र्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करून कोळी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. तसेच कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या वाल्हे परिसराला चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देईन.>श्री क्षेत्र वाल्हे देवस्थानाचा होणार विकास,श्री क्षेत्र वाल्हे देवस्थानला शासनाचा क वर्गाचा दर्जा प्राप्त आहे. परंतु शासकीय सुधारणा मात्र काहीच होत नाही. तरी त्याला ब दर्जा देऊन सोई सुविधा करून वाल्मिकी ऋषींचे भव्य स्मारक व्हावे रामनवमीला सुट्टी मिळते पण ज्यांनी रामायण लिहिले त्या वाल्मिकी ऋषींच्या जयंतीला सुट्टी मिळत नसल्याची खंत जाहीर करून वाल्मिकी जयंती दिवशी शासकीय सण साजरा करून शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: October 19, 2016 3:53 AM