त्रिपुरामध्ये झालेल्या कथित घटनेचे पडसाद अमरावती, नांदेड, मालेगावात उमटले. मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी बंद पाळला होता. त्यामध्ये हिंसा झाली. या हिंसाचाराची आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. वसीम रिजवी हा शिया बोर्डामध्ये अफरातफर करणारा आरोपी आहे. त्याने हिंसा घडविण्यासाठी वक्तव्ये केली, त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
तसेच आंदोलन करण्याचा लोकांचा अधिकार आहे. ज्यांनी आंदोलन पुकारले त्यांनी आंदोलनाचे नियोजन केलं पाहिजे. हिंसाचाराला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. वसीम रिजवी हे देशातील सलोखा बिघडेल यासाठी विधान करतात. त्यांनी शिया बोर्डाने अफरातफर केली, याची तक्रार झाली. याचा तपास सुरू असून, अद्याप यावर कारवाई झालेली नाही. या रिझवीवर तात्काळ कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचे मलिक म्हणाले.
अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. काही लोक कारस्थाने रचत आहेत. त्याला लोकांनी बळी पडू नये. समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याबाबतचे प्रकरण न्यायालयात आहे. आमची बाजू आम्ही न्यायलयासमोर मांडली असल्याचे मलिक म्हणाले.