लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पती-पत्नीमध्ये वेगवेगळ््या कारणांवरुन होणारे वाद सर्वश्रूत आहेत... यातूनच मग पतीकडून पत्नीविरोधात किंवा पत्नीकडून पतीविरोधात कारवाई करण्याची मागणीही नवीन नाही; पण वाशिम जिल्ह्यातील पती-पत्नीतील आगळावेगळा, पण तेवढाच संवेदनशील असा ‘शौचालय’ वाद थेट प्रशासनाच्या दरबारात पोहोचला असून, ‘उघड्यावर’ जाणाऱ्या पत्नीविरोधात कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या पतीराजाचे कौतुकही होत आहे.‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शासन घरोघरी शौचालय बांधण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित करत आहे. यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खेडोपाडी जनजागृतीही केली जात आहे. अनेक जण शौचालयासाठी अनुदानही घेतात, बांधतात; पण त्याचा वापर न करता सवयीप्रमाणे ‘उघड्यावर’ जातात. अनेक गावांमध्ये शौचालय ही अडगळीची खोली बनल्याचेही चित्र आहे. रिसोड तालुक्यातील भापूर येथील श्याम (काल्पनिक नाव) यांनीही शौचालय बांधले; परंतु त्यांची पत्नी यशोदा (काल्पनिक नाव) त्याचा लाभ न घेता ‘उघड्यावर’ जाते. पत्नीच्या या सवयीवरुन दोघांमध्ये अनेकदा खटकेही उडाले. वेळोवेळी समजावून सांगितल्यानंतरही पत्नी यशोदाच्या सवयीमध्ये फरक पडत नसल्याने अखेर श्याम यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे पत्नीवर दंडात्मक कारवाई करावी अशी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. श्याम यांनी पत्नीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या केलेल्या तक्रारीची सध्या जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. वाशिमचा असाही नावलौकिक !घरामध्ये शौचालय असावे, यासाठी स्वत:चे सोन्याचे मंगळसूत्र मोडून शौचालय बांधणाऱ्या संगीता आव्हाळे यांनी स्वच्छतेबाबत एक आदर्श वस्तुपाठ राज्यातील महिलांना घालून दिला होता. त्यांच्या या कार्याचा राज्य सरकारने यथोचित गौरव करुन त्यांना ‘स्वच्छतादूत’ म्हणून निवडले होते. संगीता आव्हाळे यांचा कित्ता अनेक महिलांनी गिरवला आहे. आज वाशिम जिल्हा स्वच्छतेबाबत किती जागरुक आहे, याचा परिचय श्याम यांनी पत्नीविरोधात दंडात्मक कारवाईची मागणी करुन दिला !
‘उघड्यावर’ जाणाऱ्या पत्नीवर कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 2:57 AM