पुणे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व पदाधिकार्यांनी कामे केली नाहीत. त्यामुळेच काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. पक्षविरोधी कामे करणारे गद्दार नेते व कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अशी संतप्त भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार कदम यांचा सुमारे ३ लाख १५ हजार मतांनी दारुण पराभव केला. देशभरातील मोदी लाटेमुळे व नाराजांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला पारंपरिक मते राखण्यात अपयश आले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण व चिंतन करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन येथे रविवारी झाली. त्या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, चंद्रकांत छाजेड, उपाध्यक्ष दीपक मानकर, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, नगरसेवक आबा बागुल, संजय बालगुडे आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तरीही या निवडणुकीत झालेली काँग्रेसची पीछेहाट केवळ नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे झाली, असे सांगून अंतर्गत कुरघोडीवर पांघरुण टाकता येणार नाही. केंद्र शासनाची धोरणे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात सर्वच जण कमी पडले. तसेच, शहरातील काही पदाधिकार्यांनी पक्षविरोधी कामे केल्याने पुण्याचा निकालही धक्कादायक लागला आहे. संबंधित पदाधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. त्यावर विश्वजित कदम म्हणाले, की केंद्रीय, राज्य व स्थानिक नेतृत्वापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. राज्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीतील बहुतेक नेत्यांनी एकत्रित येऊन निवडणूक काळात चांगले काम केले. परंतु, ज्या काही नेत्यांनी पक्षविरोधी काम केले, त्याचा हिशेब ठेवला आहे. त्याविषयीचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहे. (प्रतिनिधी)
पक्षविरोधी गद्दारांवर कारवाई करा
By admin | Published: May 19, 2014 12:15 AM