लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेचे चावडी वाचन करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारीनंतर अशा लोकांची हत्या करेल, असा खळबळजनक इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. स्थानिक पत्रकार भवनात ७ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यातील १४२० गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना, महाजल योजना, ग्रामीण पाणी पुरवठा तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांवर व दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च झाला. परंतु, नळ योजनेतून पाणी मिळाले नाही. या गावांचा सर्व्हे केला असता अनेक ठिकाणी कामाची सुरुवात झाली आहे. काही गावांत एक कुठे दोन तर कुठे तीन विहीरी झाल्या, पण या विहीरींना पाणी नाही. अनेक ठिकाणी अर्धवट पाईप लाईन टाकण्यात आली. विहिरीचे दान पत्रक नाही, मोटार पंप नाही, पाण्याची टाकी बांधली नाही, पाण्याची टाकी बांधली परंतु जोडणारी पाईप लाईन नाही व वितरण व्यवस्था नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत निधीची मात्र उचल झाली आहे. यासंदर्भात संबंधीत यंत्रणेकडे भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई भ्रष्टाचाऱ्यांवर झाली नाही. पिण्याच्या पाण्याअभावी आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास शंभर जणांचे बळी गेले आहेत. या योजनेत २ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सावजी यांनी केला. १४२0 गावात चावडी वाचन करुन भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा २६ जानेवारीनंतर आपण भ्रष्टाचाऱ्यांची हत्या करु, असा इशारा यावेळी सावजी यांनी दिला. यावेळी शैलेश सावजी यांची उपस्थिती होती.
भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा त्यांची हत्या करेन!
By admin | Published: June 08, 2017 2:47 AM