मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्राण्यांची विक्री करणारी बेकायदा दुकाने बंद करा, असे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले. प्राण्यांशी क्रूरतेने वागल्याबद्दल आणि बेकायदेशीररीत्या त्यांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या दुकानांना महापालिकेने परवाना दिला नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘अशा प्रकारे प्राण्यांची विक्री करणारी बेकायदा दुकाने बंद करा, तसेच पुन्हा ही दुकाने सुरू होणार नाहीत, याची काळजी घ्या,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले. ‘तिथे काय घडते, याची कल्पना महापालिकेला असावी, पण तरीही काहीही कारवाई करण्यात आली नाही. ही दुकाने बंद करण्याची आणि अशा प्रकारे प्राणी, पक्ष्यांची विक्री थांबवण्यासाठी व्यवस्थित यंत्रणा हवे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.‘सहायक महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या दुकानांवर लक्ष ठेवावे आणि पुन्हा ही दुकाने सुरू होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांची ठेवली.याचिकेनुसार, कुत्र्याची पिल्ले डोळे उघडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या आईपासून दूर केले जाते. दुकानविक्रेते निर्दयतेने पिल्लांना त्यांच्या आईपासून दूर करतात. प्राण्यांच्या औषधे दिली जातात. मोठ्या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना त्यांच्या आकारापेक्षा लहान पिंजऱ्यात ठेवले जाते, तर मांजराच्या पिल्लांनी ओरबाडू नये, यासाठी त्यांची नखे कापण्यात येतात. त्यांना क्रूरपणे वागवण्यात येते. (प्रतिनिधी)
प्राण्यांची विक्री करणाऱ्या बेकायदा दुकानांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 1:46 AM