लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अलीकडेच मुंबई विद्यापीठातील गलथान कारभाराची झाडाझडती घेतल्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपला मोर्चा कृषी महाविद्यालयांकडे वळवला आहे. दर्जाहीन कृषी महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येता कामा नये. सध्याच्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई होणे आवश्यक असून विभागाने यासंदर्भात गांभीर्याने महाविद्यालयांना समज देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी दिले.राजभवन येथे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांच्यासह राहुरी, दापोली, अकोला व परभणी कृषी विद्यापीठांचे कुलगुरू या बैठकीस उपस्थित होते. या वेळी आयसीएआरने बनविलेल्या मॉडेल अॅक्टबाबत सविस्तर चर्चा केली. यासंदर्भात महिनाभरात अहवाल सादर करण्याबाबत राज्यपालांनी निर्देश दिले. राज्यातील गुणात्मक कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांनी कृषी महाविद्यालयांच्या दर्जावर लक्ष केंद्रीत करावे. दर्जाहीन कृषी महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. असे राज्यपालांनी स्पष्ट केले.
दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करा - राज्यपाल
By admin | Published: July 11, 2017 4:57 AM