मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम २०१७च्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यात यावी. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशात पारदर्शकता येईल आणि गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षाच घ्या, असे पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांना महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) पाठवले आहे.वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी फक्त ‘नीट’ परीक्षा ग्राह्य धरली जाणार की नाही याविषयी अजून संभ्रम आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी तणावात आहेत. डिसेंबर २०१६मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. यंदा ही ‘नीट’च घेण्यात यावी अशी मार्डची मागणी आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. यापेक्षा देशभरात एकच प्रवेश परीक्षा घेण्यात यावी. आणि त्यातील गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना शासकीय, महापालिका, खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि डीम्ड विद्यापीठात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे मार्डने केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी एकच परीक्षा आवश्यक आहे. दरवर्षी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांसाठी देशात १० हजार कोटींचा काळाबाजर चालतो. याला आळा घालणे आवश्यक असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. त् अवास्तव शुल्क भरलेले नसल्यामुळे डॉक्टरांच्या मनात रुग्णसेवा हाच भाव कायम राहील. ‘एमबीबीएस’चा अभ्यासक्रम सर्वच ठिकाणी इंग्रजीत असतो. त्यामुळे ‘नीट’ प्रवेश परीक्षा देताना भाषेचा प्रश्न उद्भवणार नाही. आणि आत्ताच निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, असेही डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट घ्या
By admin | Published: May 23, 2016 4:26 AM