नागोठणे : रोहा आगाराच्या पेण बाजूकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेससाठी नागोठणे ते पेण हा मार्ग लोकल असून या मार्गातील सर्व प्रवाशांना गाडीत घ्यावे असा आदेश रोहा आगारप्रमुखांनी चालक - वाहकांना दिला आहे. याबाबत वाहतूक नियंत्रकांशी कोणताही वाद घालू नये अशा सक्त सूचना दिल्या आहेत. नागोठणे बसस्थानक रोहा आगारांतर्गत येते. येथील स्थानकात रोह्यासह महाड, श्रीवर्धन, पेण, मुरु ड, माणगाव, अलिबागसह ठाणे, पनवेल व इतर आगारांच्या एसटी येथे येत असतात. या स्थानकातून पेणपर्यंतच्या अनेक गावांतील प्रवासी असतात. या प्रवाशांना मुंबई तसेच ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यात जाणाऱ्या रोहा आगाराच्या गाड्यांचे चालक तसेच वाहक ही गाडी जलद आहे, या नावाखाली गाडीत प्रवेश देत नसल्याने अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत असतात. याबाबत येथील सेवेत असणाऱ्या वाहतूक नियंत्रकाने वाहकाला काही सांगण्याचा प्रयत्न केला असता, आपला पल्ला गाठण्याच्या नादात असलेले वाहक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या घटना नियमित दिसत असतात. चालक - वाहकांच्या या अडेलतट्टू भूमिकेमुळे एसटी महामंडळाचेच नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याकडून हा आदेश पारित करण्यात आला आहे. आगारप्रमुखांच्या या आदेशामुळे प्रवासीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
पेण मार्गातील सर्व प्रवाशांना गाडीत घ्यावे
By admin | Published: June 07, 2016 7:42 AM