ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - आपल्या विविध मागण्यासाठी आजपासून जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाने संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक बाजारपेठा ठप्प झाल्यात, तर अनेक ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा फिसकटल्यानंतर बळीराजाने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. सरकार कोणत्याही अटी ठेवून चर्चा करत नाही. शेतकऱ्यांसोबत आम्ही मार्ग काढू. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे. सगळ्यांनी चर्चेसाठी यावं. त्यामधून तोडगा काढू, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत संपर्कात आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दिलासा देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आंदोलनकर्ते, शेतकरी नेते यांच्यासोबत चर्चेसाठी आजही सरकारची दारं उघडी आहेत. शेतकऱ्यांनीही एक पाऊल पुढे टाकत चर्चेला यावं. चर्चेतून निश्चित तोडगा निघेल. शेतकऱ्यांना आवाहन करतो हिंसक होऊ नये, शांततेत आंदोलन करावं, अन्नधान्याची-दुधाची नासाडी करु नये.
संप मागे घ्या आणि चर्चेसाठी या - सदाभाऊ खोत
By admin | Published: June 01, 2017 5:05 PM