नागपूर : केंद्र सरकारच्या भूमी संपादन विधेयकातील सर्व तरतुदी शेतकरीविरोधी असून त्यातील दुरुस्ती मान्य नाही. सरकारने हे विधेयकच मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केली.भूमी संपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी अण्णा हजारे सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा करणार आहेत. यासंदर्भात सोमवारी सेवाग्राम येथे बैठक होणार आहे. भूमी संपादन विधेयकावर विरोधी पक्षांकडून टीका होत असल्याने त्यात दुरुस्तीची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शविली आहे. त्याकडे अण्णांचे लक्ष वेधल्यानंतर ते म्हणाले की, विधेयकातील सर्व तरतुदीच शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे विधेयकच मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. दुरुस्तीतून काहीही साध्य होणार नाही.सोमवारच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांचे ५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात आंदोलनाची तारीख आणि पदयात्रेचा मार्ग निश्चित केला जाईल, असे हजारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भूमी संपादन विधेयकच मागे घ्या
By admin | Published: March 09, 2015 1:38 AM