मुंबई : महिला आणि बाल कल्याण विभागाने खरेदी केलेल्या चिक्कीमध्ये आरोग्याला घातक ठरणारे घटक आढळल्यास चिक्कीचा साठा मागे घ्या, असा आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मॅगी नूडल्सबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मॅगी नूडल्स्मध्ये आरोग्याला घातक असे घटक आढळल्याने मॅगीवर बंदी घातली गेली आणि बाजारपेठेतील मॅगीचा साठा मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण विभागाने खरेदी केलेल्या सूर्यकांता चिक्कीचा साठाही मागे घेतला जाणार आहे का, अशी विचारणा राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी केली. सदर चिक्कीची अहमदनगर येथे तपासणी केली असता त्यातही घातक पदार्थ आढळल्याचा संदर्भही पावसकर यांनी दिला. त्यावर सदर बाब तपासून पाहा आणि चिक्कीत खरोखरच आरोग्यासाठी काही घातक घटक आढळल्यास साठा मागे घ्या, असे निर्देश सभापती निंबाळकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना दिले.चिक्कीत कोंबडीची विष्ठा अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील अंगणवाडीमार्फत पुरविण्यात आलेल्या चिक्कीच्या पॉकेटमध्ये कोंबडीच्या विष्ठासदृश पदार्थ आढळला असल्याने पालकवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. अंगणवाडी सेविकेने १६ जुलै रोजी बालकांना वितरित केलेले चिक्कीचे पॉकेट पालकांनी फोडले असता, त्यात कोंबडीच्या विष्ठासदृश पदार्थ असल्याचे दिसून आले. या पदार्थाचा उग्र वासही येत होता.
खराब चिक्की मागे घ्या
By admin | Published: July 18, 2015 5:19 AM