(मना रे)- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर
आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा शारीरिक स्वच्छतेचा विषय खूप महत्त्वाचा असतो, रोज सकाळी आणि रात्री दात घासायचे. वेळच्या वेळी आवश्यकतेनुसार हात स्वच्छ करायचे. वेळच्या वेळी नखे कापायची. वेळेवर जेवायचे. अशा तऱ्हेने भविष्यात काही शारीरिक आजार होऊ नये यासाठी आपण शारीरिक स्वच्छतेचे काही मूलभूत नियम आणि प्रथा पाळतो. अशा तऱ्हेने शारीरिक शुचिता आपले शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवते. याला शास्त्रशुद्ध भाषेत आपण ‘फिजिकल हायजिन’ म्हणतो. यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते. पण, याच तत्त्वावर आपण आपली मानसिक शुचिता किंवा ‘मेंटल हायजिन’ तेवढ्या कटाक्षाने नक्कीच जपत नाही. शारीरिक सुचितेबरोबरच कितीतरी अधिक पटीने मानसिक शुचिता जोपासल्यास आपल्याला या गोष्टी सहज व अधिक प्रमाणात लाभदायक ठरू शकतात. बऱ्याचदा आपण परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसारखे वागतो. परीक्षेला जाताना प्रसन्न राहण्यापेक्षा आपल्याला आठवेल की नाही, पेपर लिहून पूर्ण होईल की नाही, परीक्षेत पास होऊ की नाही असे पराभूत विचार सतत करतो. नकळत या पराभूत विचारांचा वेताळ आपल्या मानगुटीवर येऊन बसतोच. यामुळे फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होतो. आपल्या बौद्धिक मनाला हे कळलेले असते; पण कळले तरी वळत मात्र नाही. शेवटी ते आपले मानवी मन आहे. सहज बदलणार नाही. म्हणूनच एखादे प्रेरणादायी वाक्य आपण मनात सतत उच्चारले पाहिजे. सकारात्मक निग्रहांचा सराव केला पाहिजे. जेव्हा जेव्हा मला बुवा, हे जमेल की नाही? असा विचार मनात येतो तेव्हा तेव्हा मनाला तू जमवून तर पाहा, असे कणखरपणे सांगितले पाहिजे. बऱ्याच वेळा असे सांगूनही मन मानत नाही. तेव्हा मानसिक विचारांकडे सकारात्मक कसे पाहावे यासाठी काही उपाय आपणच शोधावेत. त्यासाठी मुहम्मद अली या मुष्टियोध्याची मानसिक विचार पद्धती खूप महत्त्वाची आहे. मुष्टियुद्धात एक मस्त उलटा पंच किंवा ठोसा मारून स्वत:ला न दुखवता आपण विरोधकाला चारीमुंड्या चीत करू शकतो. याच कल्पनेनुसार नकारात्मक विचारांवर मात करायला सकारात्मक विचारांचा सशक्त डोस उपयुक्त ठरतो. म्हणजेच नकारात्मक विचाराला अडवायचे असेल तर मी हे करू शकेन असा सशक्त उलटा विचार मनात उच्चारला पाहिजे. एवढेच नाही तर, सकारात्मक औषधाचा डोसही दुप्पट असायला पाहिजे. म्हणजे ‘मी हे करेनच’ असे म्हणून नकारात्मक विचारांना मनातून काढूनच टाकायला पाहिजे. हे विचारांचे खेळ तसे हास्यास्पद वाटतात. पण मनात येणारे पराभूत विचार आपल्याला जसे पराभूत करतात तसेच यशस्वी विचार आपल्याकडे यश खेचून आणू शकतात. तांत्रिक भाषेत म्हणायचे तर आपण यापूर्वी मनाला नकारात्मक ‘प्रोग्रामिंग’ केले होते; त्यामुळे आपल्या कृतीसुद्धा तशाच अपयशी होत होत्या; पण ज्या ज्या क्षणी आपण मनाला विधायक प्रोग्रामिंग करू त्या त्या क्षणी आपले सुप्त मन फक्त यशाच्या शिखरावरच झेपवायचा प्रयत्न करेल. यशाची वाटचाल करताना मनाला लागणारी ऊर्जाही आपसूक वाढत जाते. एकूण आपल्या मनाला सक्षम आणि यशस्वी करायचे आहे हे ‘मेंटल हायजिन’ या संकल्पनेत अपेक्षित आहे. आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी किंवा आपल्या महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्यासाठी पोषक असेलच याची खात्री देता येत नाही. किंबहुना अनेक वेळा आपल्याकडे संधी हाताशी आली होती; पण परिस्थिती मात्र हाताबाहेर गेली होती अशीच विरोधाभासाची स्थिती असते. मेंटल हायजिन सांभाळताना आपण मानसिक आरोग्याच्या वर्तुळात सहज प्रवेश करतो. मानसिक शुचिता जोपासल्यावर ती आपल्या अनेक समस्यांपासून आणि विवंचनांपासून दूर ठेवू शकते किंवा त्या समस्या आल्यास त्यावर तोडगा मिळवायला मदत करू शकते. मात्र मनाच्या ताकदीने विपरीत परिस्थितीवर मात करून दृष्टिक्षेपात न दिसणारे यशही खेचून आणता येते. म्हणून मनाची शुचिता जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. ‘झटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा’ हा मेंटल हायजिनचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.एडवर्ड ब्राऊन या शास्त्रज्ञाने ‘मेंटल हायजिन’ ही अत्यंत उपयुक्त संकल्पना जगासमोर आणली. सरळ, साध्या व सोप्या भाषेत ब्राऊन यांनी मनाची काळजी घेणे, शरीराची काळजी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले आहे. अनेक वेळा जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपण आपल्या मनात विघातक वा नकारात्मक विचारांचा साठा करून ठेवतो. हा साठा सावकाराकडून घेतलेल्या कर्जासारखा आहे. त्याच्यावरचे व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते व आपण त्या कर्जात कसे आणि केव्हा डुबतो हे आपल्याला समजतही नाही. मेंटल हायजिन सांभाळण्याने या अशा कर्जातून मुक्त होऊन आपण सकारात्मक विचारांचा, अचाट ऊर्जेचा व आत्मसन्मानाचा बँकबॅलन्स कसा वाढवू शकतो हे त्याने सांगितले.