मुंबई : मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ आणण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केली. प्रेक्षकांना बाहेरील खाद्य पदार्थ चित्रपटगृहांत नेण्याबाबत याचिकाकर्ते जनेंद्र बक्सी यांनी काही सूचना गुरुवारी न्यायालयात सादर केल्या. त्यांचा विचार करण्याची सूचना न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने गृहविभागाला केली. चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यासंदर्भात कायदेशीर तरतूद नसतानाही प्रेक्षकांना बंदी घातली जाते. वास्तविक, महाराष्ट्र सिनेमा रुल्सनुसार, चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे, असे याचिकेत म्हटले आहे. गेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना यासंबंधी सूचना करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार वकील आदित्य प्रताप यांनी सूचना सादर केल्या. दरम्यान, एफआयसीसीआय या मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांनी मध्यस्थी याचिका केली आहे. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, राज्य सरकार सर्व पक्षांची बाजू ऐकून निर्णय घेण्यास तयार आहे. न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य करत दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे.
चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याबाबत ठोस भूमिका घ्या, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 6:46 AM