मुंबई : ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांची ‘कुरकुर करणारा थेरडा’ अशी तुसड्या भाषेत संभावना करत नेमाडे यांनी गुपचूप पुरस्कार स्वीकारावा आणि आभार मानावेत, असा अभावित सल्ला बूकर पुरस्कार विजेते इंग्रजी साहित्यिक सल्मान रश्दी यांनी टिष्ट्वटरवरून दिला. नेमाडे यांनी (माझ्या) ज्या लेखनावर टीका केली ते त्यांनी वाचले तरी का, याबाबतही रश्दी यांनी शंका व्यक्त केली. ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेमाडे यांनी मुंबईत केलेल्या भाषणात रश्दी आणि व्ही.एस. नायपॉल यांच्या लेखनावर टीका केली. ही टीका चांगलीच झोंबल्याने त्याला प्रत्युत्तर देताना रश्दींनी नेमाडेंबद्दल अर्वाच्च भाषा वापरली. नेमाडे यांनी मुंबईतील आपल्या भाषणात इंग्रजी भाषेवर भारतीय शिक्षणक्षेत्राने बंदी घालावी, अशी मागणी केली होती. तसेच इंग्रजी ही किलर भाषा आहे, या भाषेमुळे नोकरी मिळते ही केवळ अंधश्रद्धा आहे, असे म्हटले होते. या वेळी त्यांनी रश्दी यांच्यासह नायपॉल यांच्यावरही टीका केली होती. साहित्य वर्तुळातून मात्र नेमाडे-रश्दी वाचकांमध्ये शाब्दिक वाद सुरू आहे, शिवाय सोशल नेटवर्किंग साईट्सवरही याचे पडसाद उमटले आहेत. मात्र आसाममध्ये असलेल्या डॉ. नेमाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार म्हणाले की, रश्दींचे हे वक्तव्य व्यक्ती म्हणून त्यांच्या संस्कृतीला धरूनच आहे. नेमाडेंच्या भूमिकेला विरोध करायचा होता, तर एखादा लेख लिहून प्रतिवाद करू शकत होते. परंतु, लेखनापेक्षा व्यक्तिगत जीवनात रश्दींना कायम रस राहिला आहे, त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारची टीका केली आहे. इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची दखल जेवढी घेतली नाही, तेवढी रश्दींची घेतली हे दुर्दैवी आहे.पातळ्या सोडणे हे उद्योग सगळ्या पातळ्यांवर होत आहेत. इतके लक्ष आपल्या लेखनाकडे का देत नाहीत लेखक लोक जितके या फिजूल गोष्टींकडे देतात, असा सवाल कविता महाजन यांनी केला. (प्रतिनिधी)
गुपचूप पुरस्कार घ्या आणि आभार माना!
By admin | Published: February 09, 2015 6:00 AM