मुंबई : रेल्वे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक नेमा, अशी सूचना सोमवारी उच्च न्यायालयाने पश्चिम व मध्य रेल्वेला केली. तर त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने करावी, अशीही सूचना उच्च न्यायालयाने या वेळी केली.डॉक्टरांचे विशेष पथक नेमले तर रेल्वे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळेल. डॉक्टरांच्या विशेष पथकासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सूचना न्या. व्ही.एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाने केली.रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेले समीर झवेरी यांनी अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरील सूचना केली. रेल्वेने जवळपासच्या खासगी रुग्णालयाशी करार करून अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करावे. त्यामुळे पीडित व्यक्तीला ‘गोल्डन अवर’ (अपघात झाल्यानंतर एका तासात)मध्ये वैद्यकीय मदत मिळेल, अशीही सूचना खंडपीठाने पश्चिम व मध्य रेल्वेला केली. मात्र याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप हवनुर यांनी खासगी रुग्णालये पीडित व्यक्तीला दाखल करून घेत नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणले.त्यावर रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी रेल्वे अपघात रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना आखल्या असल्या तरी अपघात होतच असल्याची खंत व्यक्त केली. रेल्वे अपघाताला आळा घालण्यासाठी आतापर्यंत आखलेल्या उपाययोजनांचा अहवालाही या वेळी कुमार यांनी खंडपीठापुढे सादर केला.महत्त्वाच्या स्थानकांवर व ज्या स्थानकांवर १००हून अधिक अपघात होत आहेत, अशा स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय स्थळ बांधण्याचा विचार रेल्वे करीत असल्याची माहितीही कुमार यांनी खंडपीठाला दिली. वांद्रे, अंधेरी, बोरीवली अशा महत्त्वाच्या १० स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय रूम बांधण्यास सुरुवात केली आहे, असे सुरेश कुमार यांनी सांगितले. याशिवाय रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी फुट ओव्हर ब्रिज (एफओबी), सरकते जिने आणि ट्रॅकच्या बाजूला लोखंडी रॉड लावण्याचे काम सुरू आहे, असेही रेल्वेने खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकांवर डॉक्टरांचे पथक नेमा
By admin | Published: January 26, 2016 3:01 AM