Exclusive: 'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंना संजय राऊतांनी दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 02:54 PM2020-01-15T14:54:54+5:302020-01-15T14:55:33+5:30
अजित पवारांना संजय राऊतांकडून आगळावेगळा सल्ला
पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर सातत्यानं भाजपाला लक्ष्य करणारे आणि शिवसेनेची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांची आज लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी निकालाआधीच ठरलेलं सत्ता स्थापनेचं प्लानिंग, पत्रकारितेतलं दिवस, उदयनराजेंची शिवसेनेवरील टीका, भाजपाकडून वारंवार उपस्थित केला जाणारा हिंदुत्वाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचं नातं यासह अनेक मुद्द्यांवर दिलखुलास भाष्य केलं. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. या मुलाखतीच्या शेवटी राऊत यांना काही नेत्यांची नावं विचारण्यात आली. या नेत्यांचं वर्णन कसा कराल आणि त्यांना काय सल्ला द्याल, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास सल्ला दिला.
संजय राऊत यांनी राजकीय नेत्यांचं केलेलं वर्णन आणि त्यांना दिलेले सल्ले
उद्धव ठाकरे- निष्कपट व्यक्तिमत्त्व. आता आपण मुख्यमंत्री आहात. त्यामुळे कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर- भाजपाला मदत होईल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये.
असदुद्दीन ओवेसी- उत्तम कायदेपंडित. स्वत:ची भूमिका पटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पण त्यांनी व्होट कटिंग मशीनची प्रतिमा बदलायली हवी.
अजित पवार- सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री. कामाला वाघ आहेत. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आहे. हिंमतीने काम करणारा माणूस. तोंड खराब आहे. ते त्यांनी तसंच ठेवावं.
राज ठाकरे- कलावंत माणूस. उत्तम व्यंगचित्रकार. राज ठाकरे नेतेसुद्धा आहे. पण त्यांच्यातली व्यंगचित्रकला संपत चाललीय. राज ठाकरेंनी अधूनमधून ब्रश घेऊन फटकारे मारले पाहिजेत.