सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण पक्षातून बाहेर पडल्यानंतरही सांगलीत राष्ट्रवादीचे १४ सदस्य विजय झाले, ही चांगली कामगिरी आहे. मात्र यात सुधारणा झाली पाहिजे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केल्यास त्यांच्याबरोबर आघाडी करावी, अशा सूचना राष्ट्रवादीचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांना दिल्या.राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री, आमदार यांना मुंबईतील बैठकीसाठी शनिवारी बोलाविले होते. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील कामगिरीचा आढावा पवार यांनी घेतला. यावेळी सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आदी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी आढावा सादर केला. राष्ट्रवादीतून अनेक नेते बाहेर पडल्यानंतरही जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचल्याबद्दल जयंत पाटील, सुमनताई पाटील यांचे पवार यांनी अभिनंदन केले. काँग्रेसने सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची सूचनाही पवार यांनी जयंत पाटील यांना दिली. (प्रतिनिधी)...तरच चमत्कारशरद पवार यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला मदत करण्याची सूचना दिल्यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना पहिल्या टप्प्यात तरी यश आले आहे. सत्ता मिळविण्यासाठी लागणारे ३१ सदस्य जमविणे काँग्रेसला एकट्याने प्रयत्न करून शक्य होणार नाही. त्यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील गेले तरच चमत्कार घडू शकतो.
काँग्रेसबरोबरच आघाडी करा
By admin | Published: March 05, 2017 12:38 AM