मुंबई : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानानेही २०० रुपये दर्शन फी आकारण्यास सुरुवात केल्याने देवस्थानाच्या एका विश्वस्तानेच उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांच्या या तक्रारीवर मुंबई धर्मदाय आयुक्तांना याबाबत सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.१२ ज्योर्तिलिंग एकत्र असलेले देशातील त्र्यंबकेश्वर हे एकमेव मंदिर आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टने भाविकांकडून दर्शनासाठी २०० रुपये आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्राद्वारे उच्च न्यायालयाकडे तक्रार केली. दर्शनासाठी भाविकांकडून फी आकारण्यात येऊ नये, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच त्यांनी या पत्राला पुरातत्त्व विभागाने देवस्थानाला लिहिलेले पत्रही जोडले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे संरक्षित स्मारक असल्याचे पुरातत्त्व विभागाने पत्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे संबंधित कायद्यांतर्गत दर्शन फी म्हणून २०० रुपये आकारता येणार नाहीत, असे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ‘आम्ही त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांना दर्शन फी आकारू नये, अशी विनंती केली. तरीही ते दर्शन फी आकारत आहेत,’ असेही शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांची ही तक्रार उच्च न्यायालयाने धर्मदाय आयुक्तांकडे पाठवत जलदगतीने यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)
त्र्यंबकेश्वरच्या ‘दर्शन’ फीसंदर्भातील तक्रारीवर सुनावणी घ्या
By admin | Published: March 14, 2017 4:53 AM