ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 10 - मुलगी झाली म्हणून एका कुटुंबाने तिचे जंगी स्वागत करण्यासाठी हत्तीवरुन साखर वाटली आहे. वाळावा तालुक्यातील बागणी गावात राहणा-या कदम परिवाराच्या घरात एका नव्या पाहुणीचे आगमन झाले. मुलगी झाली म्हणून तिच्या जन्माचा आंदोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कदम कुटुंबीयांनी तिच्या बारशाला हत्तीवरुन साखर वाटली.
कदम परिवाराने नव्या सदस्येचं नाव दुर्गा असे ठेवले. कदम कुटुंबीयांनी याद्वारे समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. एकीकडे स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, कदम कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करुन मुलींचा गर्भातच जीव घेणा-यांना सणसणती चपराक लगावली आहे.
सांगलीतील म्हैसाळ अवैध गर्भपात केंद्र प्रकरण
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील बेकायदा भ्रूणहत्येचा विषय गाजत आहे. बेकायदा गर्भपात केंद्र चालवून भ्रूणहत्या करणारा डॉक्टर बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे. मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यामुळे खिद्रापुरेचे बेकायदा गर्भपात केंद्र उघडकीस आले होते. तसेच खिद्रापुरे याने म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरलेले 19 भ्रूण पोलिसांनी शोधले होते.
खिद्रापुरे याच्या रुग्णालयातून यापूर्वी क्ष-किरण यंत्र, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधे, इंजेक्शन्स, भुलीच्या औषधांचा साठा, महत्त्वाची कागदपत्रे व संगणक, गर्भपातासाठी आलेल्या महिलांच्या नावांचे रेकॉर्ड जप्त केले आहे. खिद्रापुरेकडे होमिओपॅथी पदवी असताना स्त्री भ्रूणहत्येसाठी महिलांच्या अवैध शस्त्रक्रिया केल्या असून, या कामात त्याने सांगली, मिरजेतील काही डॉक्टर व स्वत:च्या पत्नीची मदत घेतल्याची माहिती पोलीस चौकशीतून पुढे येत आहे.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू आहे. दरम्यान आ. सुरेश खाडे यांनी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन, म्हैसाळप्रकरणी खिद्रापुरे याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.