दीपक भातुसे
आतापर्यंत केवळ जीआर आणि पत्रांचाच भडीमार, प्रत्यक्ष पदभरतीची प्रतिक्षाच
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील जिल्हा परिषदांमधील पदभरती रखडल्याने भरती इच्छूक उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हा असंतोष लक्षात घेता २०१९ पासून रखडलेली जिल्हा परिषदांमधील पदभरती करण्याकरता तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती करणारे पत्र ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लिहले आहे.
ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र लिहले आहे. या विषयाचे गांभीर्य आणि २०१९ पासून जिल्हा परिषदांमधील पदभरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेता जाहीर पदभरती करण्याकरताा तात्काळ कार्यवाही करावी, ही विनंती, असा या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
'लोकमत'ने मागील मागील १० दिवस सातत्याने रखडलेल्या पदभरतीबाबत आवाज उठवला आहे. 'जिल्हा परिषदांमधील साडे तेरा हजार पदांच्या भरतीचा ४ वर्ष खोळंबा' अशा आशयाचे वृत्तही 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. लोकमतच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र यापूर्वीही जिल्हा परिषदेतील रखडलेल्या भरतीबाबत ग्रामविकास विभागाने अनेक पत्र लिहीली, अनेक जीआर काढले. तब्बल २०१७ पासून जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीबाबत राज्य सरकारने अनेक जीआर काढले आहेत, अनेक पत्रे लिहली आहेत. मात्र प्रत्यक्ष पदभरती कधी होणार याची प्रतिक्षा राज्यातील बेरोजगार युवकांना असून भरतीची वाट बघत त्यांच्यातील नैराश्य आणि असंतोष वाढत आहे.
आतापर्यंतचे जीआर आणि पत्रे
- २४ ऑगस्ट २०१७ - जिल्हा परिषदेतील गट क प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन भरती प्रक्रियाा राबवण्याचा निर्णय
- २३ जुलै २०१८ - राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट-क संवर्गातील रिक्त पदांची परीक्षा निवड समितीऐवजी जिल्हा परिषदेमार्फत घेण्याचा निर्णय
- १३ फेब्रुवारी २०१९ - राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या गट- क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्यातबाबत सूचना
- १६ जून २०२१ आणि २५ जून २०२१ रोजी परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना पत्राद्वारे सूचना
- २८ जून २०२१ - एसईबीसी आरक्षण कायदा रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढलेल्या जागा आणि अनुकंपाचे प्रमाण वाढवल्यामुळे भरतीबाबत कार्यवाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- २० ऑगस्ट २०२१ - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरतीसाठी दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट झाल्याने तसेच एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गांतर्गत नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गाकरता जाहीरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्याचा निर्णय
- २० ऑगस्ट २०२१ - मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय
- २९ सप्टेंबर २०२१ - मार्च २०१९ सालच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
- १५ नोव्हेंबर २०२२ - जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रमाचे जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्यासाठी पदांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागवणे, परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे, परीक्षा घेणे याची जबाबदारी जिल्हा निवड मंडळाची राहिल याबाबत निर्णय
- २५ नोव्हेंबर २०२२ - जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्याबाबत निर्णय