सुवर्णा माटेगावकर, केतकी माटेगावकर‘केतकीने एवढ्या लहान वयात मिळवलेलं यश पाहून मला नेहमीच गहिवरून येतं. एका आईसाठी यापेक्षा मोठं सुख ते काय असू शकतं? मी गायनाच्या क्षेत्रात कार्यरत असले तरी अभिनयाशी माझा काहीही संबंध नाही. केतकीला अभिनयाचा वसा तिचे आजोबा किशोर माटेगावकर यांच्याकडून मिळाला. ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकासाठी प्रभाकर पणशीकरांनी तिला विचारणा केली. त्यांच्याकडून तिला अभिनयाचे अनेक पैैलू समजून घेता आले. गायनाची आवड केतकीच्या रक्तातच आहे. सुरुवातीला तिने प्रतिभा कर्णिक यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. आता ती देवकी पंडितांकडे जयपूर घराण्याची गायकी शिकत आहे. आपण पैैसा आणि प्रसिद्धीसाठी कधीच गायचं नाही. गाण्यासाठी रियाझ आणि रियाझासाठी गाणं हे सूत्र लक्षात ठेवायचं, हे तार्इंनी तिच्या मनावर बिंबवलं आहे. अभिनय आणि गायन या दोन्ही जबाबदाऱ्या पेलताना तिने शिक्षणाकडेही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हीही तिच्यावर शिक्षणाचं कोणतंही बंधन लादलेलं नाही. करिअर सांभाळून जमेल तशी परीक्षा देण्यासाठी आम्ही तिला नेहमीच पाठिंबा देतो. नुकताच तिचा ‘केतकी’ हा अल्बम प्रकाशित झाला. त्या अल्बमची तयारी आणि सलग तीन चित्रपट यामुळे तिने मध्यंतरी एक वर्षाची गॅप घेतली होती. आता पुन्हा तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे. हे सगळं करत असताना तिने मित्र-मैत्रिणी, खरेदी, भटकंती या गोष्टीही अनुभवाव्यात, असाच आमचा प्रयत्न असतो. आपल्या करिअरच्याबाबतीत केतकीने काही मैैलाचे दगड ठरवले आहेत. तिचं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न म्हणजे तिला एकदा तरी ‘सवाई गंधर्व’ महोत्सवामध्ये गायचं आहे. गुलजार, जावेद अख्तर अशा दिग्गजांबरोबर काम करायचं आहे. आम्ही दोघीही किशोरकुमारांच्या चाहत्या आहोत. कारण, दोघींनाही जुने चित्रपट खूप आवडतात आणि त्यातूनच तिला खूप काही शिकायला मिळतं. शिकण्याची ही प्रक्रिया, बारीक निरीक्षण केतकीला एक दिवस तिची स्वप्न पूर्ण करायला हातभार लावेल, असा मला विश्वास वाटतो.केतकी आणि माझ्यात दृढ मित्रत्वाच्या नात्याचे बंध जुळले आहेत. आयुष्यातील प्रत्येक घटना, प्रसंग, विचार ती आम्हा दोघांशी मनमोकळेपणाने शेअर करते. ती मला ‘ए बाबा’ अशीच हाक मारते. वडील आणि लेकीच्या नात्यातला दुरावा गळून पडतो आणि बंध आणखी दृढ होतात. आमच्या तिघांचे कारकिर्दीचे क्षेत्र, आवडीनिवडी, विचार समान असल्यामुळे ‘लेक लाडकी’ म्हणताना ऊर अभिमानाने भरून येतो. - पराग माटेगावकरगाणं गाताना आणि विविध भूमिका साकारताना असलेला आई-बाबांचा पााठिंबा माझ्या पंखांमध्ये बळ निर्माण करतो. मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे ते पझेसिव्ह आहेतच. पण, हा सकारात्मक पझेसिव्हनेस मला मोठी भरारी घेण्याचा आत्मविश्वास देतो. प्रत्येक मुलीला असे आई-बाबा मिळाले तर ती दहापट जास्त प्रगती करू शकते. मी अभिनय, गायनामध्ये मेहनतीने यश मिळवावं, असं त्यांचं स्वप्न आहे आणि मला त्यांचं हे स्वप्न प्रामाणिकपणे पूर्ण करायचंय.- केतकी माटेगावकर, अभिनेत्री