कोल्हापूर : विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण आणि मुंबईतील टाईम स्लॉटचा मुद्दा मार्गी लागण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, कोल्हापुरातील विमानसेवेचा सप्टेंबरअखेरीस पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. सेवेबाबत ‘डेक्कन चार्टर एव्हिएशन’ कंपनीचे अधिकारी विमानतळाची पाहणी करणार आहेत.धावपट्टीची दुरुस्ती, विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, आदी कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्याने येथील विमानसेवा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली. मात्र, विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण, मुंबईतील टाईम स्लॉट, आदी मुद्दे अडथळा ठरले. ते दूर करण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि डेक्कन चार्टरचे अधिकारी यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. विमान उड्डाण परवाना नूतनीकरणासाठी नागरी विमान चालनाच्या (डीजीसीए) संचालकांकडून काही अटींची पूर्तता करावयास सांगितले होते. यात रन-वेची डागडुजी, रुग्णवाहिका-अग्निशमन दलाचा बंब, आदींचा समावेश होता. त्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक कार्यवाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासनाने कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्याबाबत गेल्या तीन वर्षांत सकारात्मक पावले टाकली आहेत. लवकरात लवकर विमानसेवेचा प्रारंभ करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ सप्टेंबरअखेरीस, विमानसेवा परवान्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:17 AM