यदु जोशी,
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक हजार खेड्यांचा चेहरामोहरा खासगी कंपन्यांच्या सहभागातून बदलविणारे जे मिशन जाहीर केले आहे त्यात राज्यातील कोणत्याही व्यक्तीला वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे केवळ सरकार आणि विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) होणारे मिशन नाही. त्यात एनजीओ असतीलच; पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन झालेल्या ‘सहभाग’ या पोर्टलवर जाऊन कोणीही त्यात सहभागी होऊ शकेल. हजार खेड्यांच्या आमूलाग्र विकासासाठी आपल्याला निधी द्यायचा असेल, आपल्याकडील कौशल्याचा उपयोग करून द्यायची इच्छा असेल वा स्वयंसेवक म्हणूनही झोकून देण्याची तयारी असेल तर ‘सहभाग’वर तुम्हाला नोंदणी करता येईल. समाजासाठी वेगळे काही करून दाखविण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी आता तरुणाईसह सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. या हजार गावांमध्ये प्रत्येकी एक व्हिलेज एक्झिक्युटीव्ह आॅफिसर (व्हीईओ) म्हणजे ग्राम कार्यकारी अधिकारी नेमण्यात येईल. विकासाच्या सर्व योजनांमध्ये समन्वय, अंमलबजावणी यावर तो लक्ष ठेवेल. ग्रामविकासासाठी समर्पित भावनेने काम करण्याची तयारी असलेल्यांना त्यासाठी संधी दिली जाईल. आयआयटी मुंबईच्या माध्यमातून आयआयटीयन्सची मोठी फळी आज ‘सी-तारा’च्या माध्यमातून गावागावांत अभिनव कल्पना राबवित असते. या तरुणाईची सांगड मुख्यमंत्र्यांच्या मिशनशी घालण्याची तयारी प्रा. मिलिंद सोहोनी यांनी या बैठकीत दर्शविली. नामवंत शैक्षणिक संस्था व स्थानिक अभियांत्रिकी कॉलेजांना या मिशनमध्ये सहभागी करून घेण्याची सूचना प्रख्यात अणुशास्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केली. या मिशनची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली तर ते ग्रामविकासाचे पर्यायी मॉडेलच ठरेल, असा विश्वास प्रख्यात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. >रॉनी स्क्रूवालांचे मॉडेलस्वदेश फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि त्यांच्या पत्नी झरिना यांनी रायगड जिल्ह्यात अनेक गावे दत्तक घेऊन विकासाची कामे हाती घेतली असून, प्रत्येक गावात एक व्हिलेज एक्झिक्युटीव्ह आॅफिसर (व्हीईओ) म्हणजे ग्राम कार्यकारी अधिकारी नेमला आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या मिशनमध्ये असे व्हीईओ नेमण्यात येणार आहेत.>रिलायन्स जिओचे नेटवर्कहजार खेड्यांच्या विकासाचे संनियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात विशेष कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठीचे डिजिटल सेंटर हे रिलायन्स जिओ उभारून देणार आहे. याशिवाय आमचे राज्यभरातील डिजिटल नेटवर्क २४ तास या मिशनसाठी उपलब्ध करून दिले जाईल.- निखिल मेस्वानी, कार्यकारी संचालक, रिलायन्स इंडस्ट्रिज लि.>बिर्ला म्हणाल्या, ३०० गावांची जबाबदारी आमची दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिर्ला उद्योग समूहाच्या राजश्री बिर्ला यांनी, ‘एक हजार गावांपैकी ३०० गावांच्या विकासाची जबाबदारी आमची’ असा शब्द मुख्यमंत्र्यांबरोबरच्या कालच्या बैठकीत दिला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागत करण्यात आले.>मंत्रालयात त्यांचे येणे विकासात हातभारासाठीबड्या उद्योगपतींकडील अधिकारी मंत्रालयात वर्षानुवर्षे फिरताना दिसतात ती आपापल्या कंपन्यांची कामे घेऊन. मात्र, गुरुवारी दिग्गज उद्योगपतींची मंत्रालयात मांदियाळी होती ती राज्याच्या विकासात हातभार लावण्यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते आले होते. प्रगतीच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मंत्रालयात इतक्या सन्मानाने आम्हाला आधी कधी बोलविले गेले नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.