मुंबई : गिरणी कामगारांसाठी बांधलेली घरे देण्यात सरकार दिरंगाई करीत आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांचा आणि गिरण्यांच्या मोकळ््या जागांचा कामगारांनी सहकुटुंब ताबा घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी केले.घरांच्या मागणीसाठी गेल्या आठ महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चर्चा केली नसल्याने संतप्त गिरणी कामगारांनी राणीबाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला पाठिंबा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आंदोलनाला हजेरी लावली. मैदानावर धडक मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची युती सरकारने तत्काळ अंमलबजावणी करण्याची एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी या वेळी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की आघाडी सरकारने गिरणी कामगारांसाठी योग्य धोरण आखले आहेत. तसे निर्णयही झाले आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत आहे. एमएमआरडीएची घरे तयार आहेत. मात्र त्यांची लॉटरी काढण्याऐवजी सरकार नव्या जागांचा शोध घेऊन घरे बांधण्याची भाषा करीत आहे. त्यामुळे सरकारची नियत योग्य दिसत नाही. परिणामी गिरणी कामगारांनी स्वत:च पुढाकार घेऊन घरांचा ताबा घ्यावा. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना मदत करेल, असेही ते म्हणाले. मराठी माणसाच्या नावाने मते मागणाऱ्या शिवसेनेने ठरवल्यास कामगारांना तत्काळ घरे मिळू शकतात. मात्र त्यासाठी सरकारमध्ये असलेल्या सेनेने भाजपावर दबाव टाकण्याची गरज आहे. तसे झाल्यास कामगारांना सहज घरे उपलब्ध होतील. त्यामुळे भाजपा कामगारांना घरे देण्यास दिरंगाई करीत असेल तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.इतर कामगार वर्गाचा पाठिंबामाथाडी कामगार व डबेवाल्यांनीही गिरणी कामगारांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यापुढे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली नाही, तर डबेवाले आणि माथाडी कामगारही गिरणी कामगारांसोबत लढ्यात उतरणार असल्याचे जाहीर केले.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्षमंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांचे प्रश्न समजून घेतले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका गुरुवारी विधान भवनात जाहीर करणार असल्याचे सांगितले. मात्र नेमके काय जाहीर करणार, याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही खुलासा केला नसल्याने गिरणी कामगारांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे.
बांधलेल्या घरांचा ताबा घ्या
By admin | Published: July 16, 2015 12:28 AM