अकोला : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर थोड्याच वेळात निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट... यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता असून, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या निकालापूर्वीच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी एक धक्कादायक मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे.
बुधवारी उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी, भाजपाचे नेते जे सांगतील तोच निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट केल्यास सर्व निकाल बाहेर येईल, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच, विधानसभेच्या अध्यक्षांना न्यायाधीशाचा दर्जा होता. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणे आणि वारंवार दिल्ली दरबारी हजेरी लावणे आणि विचारपूस करून निर्णय देणे, हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. ते अतिमहत्त्वाचं आहे, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांच्या या धक्कादायक मागणीने एकच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाला असून, तो आमच्या विरोधात जाणार आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार अपात्र ठरणार आहेत, असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले, खरंतर मी निकालाबाबत उत्सुक होतो. ही लढाई सत्य आणि सत्तेमधील असेल, असं वाटत होतो. मात्र आता मंत्रालयात फिरत असताना मला अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार भेटले. त्यांनी हा निकाल ठाकरे गटाविरोधात लागणार असून, ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरणार असल्याचे सांगितले. याआधी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह जाईल असा दावा करण्यात येत होता. तसं पुढे घडलं होतं. आता उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार अपात्र ठरतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा निकाल ठरवून घेतलेला आहे. आता आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टात तर जाणारच आहोत. सोबतच आम्ही जनतेसमोरही जाणार आहोत, असे संकेतही वैभव नाईक यांनी दिले.