समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी २१ सप्टेंबर १९१७ या दिवशी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा केला होता. हा दिवस ‘राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन’ म्हणून साजरा करण्याची भूमिका पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी २६ जून रोजी ‘शाहू पुरस्कार’ स्वीकारताना मांडली होती. या भूमिकेबाबत एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका सविस्तर पत्राद्वारे उपक्रम सुचविले असून, त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली.२६ जून रोजी डॉ. माशेलकर यांना येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचा शाहू पुरस्कार प्रदान केला. याच दिवशी ‘लोकमत’मध्ये शाहू महाराजांनी शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक रुपये दंडचा कायदा केला होता, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत डॉ. माशेलकर राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांबाबत विस्ताराने बोलले होते. २१ सप्टेंबरला हा कायदा करून १०० वर्षे होत असल्याने हा दिवस ‘राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन उपस्थितांना केले होते. त्यानंतर आता डॉ. माशेलकर यांनी हा दिवस कसा साजरा करता येईल, याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ट्रस्टचे विश्वस्त प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पत्रे पाठवून उपक्रम सुचविले आहेत. या दिनाच्या निमित्ताने पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत विविध स्तरांवर सध्या दिल्या जात असलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने कोणते बदल आवश्यक आहेत, याचा वेध घेण्यासाठी याबाबत समग्र विचारमंथन व्हावे असे वाटते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. उत्तम प्रशिक्षण झाल्याशिवाय आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणे शक्य नाही. सातत्याने प्रशिक्षण दिल्याने सकारात्मक मानसिकता घडविण्यास ते उपयोगी ठरते. त्यादृष्टीने काय करता येईल, हेही पहायला हवे, असे वाटते, असे डॉ. माशेलकर यांनी पत्रात नमूद केले आहे. नवनिर्मितीचा ध्यास घेणारी मुले घडवावीतशिक्षणातील तोच तो पणा आणि ठरावीक पठडीतले अभ्यासक्रम, शिकविण्यापलीकडे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांनी सृजनशीलपणे, स्वतंत्रपणे विचार करावा. यासाठी त्यांच्या अंगी तशी क्षमता येण्याची गरज आहे. असा नवनिर्मितीचा ध्यास घेणारी मुलं-मुली यापुढील काळात आपल्या विविध समस्यांवर उपाय शोधून काढू शकतील. मुलांच्या सृजनशील कल्पनांना वाव देण्याच्या दृष्टीने विविध प्रश्न आणि त्याबाबत नव्या पिढीने अभ्यासपूर्वक सुचविलेल्या उपाययोजना असाही उपक्रम हाती घेता येईल, असे डॉ. माशेलकर यांनी सुचविले आहे.‘लोकमत’चा पाठपुरावा२६ जून रोजी शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये डॉ. माशेलकर यांनी आवर्जून ‘लोकमत’चा उल्लेख केला होता. त्यानंतरही ‘लोकमत’ने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता २१ सप्टेंबर रोजी कोल्हापूरमध्ये ‘राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन’ आयोजित केला जावा आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, शिवाजी विद्यापीठ आणि राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने सक्रिय सहभाग घ्यावा, असेही डॉ. माशेलकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
शाहू शिक्षण क्रांती दिनी गुणवत्तेचा आढावा घ्या-- रघुनाथ माशेलकर यांची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:05 AM