'अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा', काँग्रेस नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 05:44 PM2021-01-21T17:44:04+5:302021-01-21T17:45:32+5:30

balasaheb thorat : जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्णब गोस्वामींविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई केली नाही का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी  उपस्थित केला आहे.

'Take stern action against Arnab Goswami', demands Congress leader balasaheb thorat | 'अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा', काँग्रेस नेत्याची मागणी

'अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा', काँग्रेस नेत्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देया प्रकरणात अर्णब गोस्वामींना मदत करणा-या उच्चपदस्थांवर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुंबई :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्णब गोस्वामींना कशी मिळाली? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच, त्यांनी स्वतः सांगितले आहे की ज्यांनी ही माहिती दिली ते मोदी सरकारमधील मोठे व्यक्ती आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5  नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामींना तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे शुक्रवार दि. २२ जानेवरी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

अर्णब गोस्वामींना देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली? त्याने ती माहिती आणखी किती लोकांना दिली? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्णब गोस्वामींना गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत का? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसै न देता त्यांच्या फ्रिक्वन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा अर्णब गोस्वामींना मोठा पाठिंबा आहे, असा आरोप करत जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्णब गोस्वामींविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई केली नाही का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी  उपस्थित केला आहे.

या व्हॉट्स अप चॅटवरून अर्णब गोस्वामी यांचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह केंद्र सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्याला नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे समोर येत आहे. त्यासोबतच पुलवामातील हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजपा सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटे अर्णब गोस्वामी हे दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून अर्णब  गोस्वामींचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अर्णब गोस्वामींना मदत करणा-या उच्चपदस्थांवर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

Web Title: 'Take stern action against Arnab Goswami', demands Congress leader balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.