ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - बेकायदेशीर दुकाने थाटून फटाक्यांची विक्री करणा-यांवर कारवाई करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने आज राज्य सरकारला दिले आहेत. तसेच केवळ परवाने रद्द करून चालणार नाही, याविरोधात कठोर कारवाई करा, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. 'बेकायदेशीर चालणा-या फटाक्यांच्या दुकानांतील दुर्घटनेत होणारी जीवितहानी ही गंभीर बाब आहे.
गर्दीच्या ठिकाणी, निवासी परिसरात बेकायदा दुकानांमध्ये फटक्यांचा साठा करण्याचे परवाने रद्द करून काहीही फरक पडणार नाही, लोकांच्या जिवाला धोका निर्माण करणा-या अशा फटाका व्रिकेत्यांवर कठोर कारवाई करा', असे हायकोर्टाने म्हटले आहे.
निवासी वसाहतीतील बेकायदेशीर फटाक्यांच्या दुकानांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी निर्णय देताना हायकोर्टाना राज्य सरकारला याविरोधात कठोर कारवाई करायला सांगितले आहे.