पुणे : ‘सर्जिकल स्ट्राइक’चा राजकीय फायदा घेण्याच्या प्रकाराची आपण वारंवार निंदाच करू, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर गुरुवारी पत्रकार परिषदेत निशाणा साधला. आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर झगडणाऱ्या सैन्यदलाविषयी शंका घेणे ही अत्यंत अयोग्य बाब आहे, याकडेही समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
‘भ्रष्टाचार आणि अनागोंदी आजही माजलेली असली, तरी त्याविरोधात जनजागृती होत असल्याचे चित्र नक्कीच स्वागतार्ह आहे, असे सांगून लोकपाल व लोकायुक्त कायद्यासाठी केंद्र सरकारविरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. हजारे यांच्या जीवनकार्यावर चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यात आले असता ते बोलत होते. ‘‘माझे वय ७९ आहे आणि इतक्या वर्षांचा इतिहास पडद्यावर दाखविणे सोपी गोष्ट नाही. जीवन निष्कलंक असले पाहिजे. समाजासाठी आपण जगायला हवे. युवकांना या चित्रपटातून प्रेरणा मिळावी. भ्रष्टाचार संपला नसला, तरी त्याविषयी जी जागृती झालीय ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हा चित्रपट पाहून देशभरातील युवकांमध्ये पुन्हा जागृती आणि जोश निर्माण होईल,’’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)