बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केलं आहे. पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच जयंत पाटील हे शनिवारी (२७ जुलै) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
यावेळी धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे, असे राजकारण कधीच केले नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
याचबरोबर, जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ''राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी ३५ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली. परंतु हे ट्विट अजित पवार यांनी केलं नाही. त्यांना बळजबरीने करायला लावलं आहे. डॉन चित्रपटात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत होते. तशी गत लाडकी बहीण योजनेची आहे", असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.