मुंबई – महाराष्ट्रात लोकशाहीचा खून होतोय, तारीख पे तारीख दिली जातेय. १ वर्ष संविधानाच्या विरोधात घटनेच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन सरकार चालवलं जातंय. निर्णय प्रक्रियेला विलंब व्हावा म्हणून अध्यक्ष परदेश दौऱ्यावर गेले आहेत असा आरोप ठाकरे गटाचा खासदार संजय राऊतांनी करत भाजपावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, घाना नावाचा देश आहे. महाराष्ट्रातच काय देशातील ९० टक्के लोकांना हा देश माहिती नाही. तिथेही लोकशाही अस्थिर असते. तिथे कॉमनवेल्थच्या मैदानावर आमच्या विधानसभेचे अध्यक्ष लोकशाहीवर प्रवचन द्यायला चालले आहेत. पण या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करून तुम्ही घानाला चाललाय हे लज्जास्पद आहे. राज्यात संविधान, घटना, लोकशाहीचा गेल्या वर्षभरापासून खून करताय, बेकायदेशीर सरकारला पाठिंबा देताय, तारखावर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवताय असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत माझ्या माहितीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल लवकर द्यावा असे आदेश दिलेत. त्यातून पळ काढण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची वर्णी घाना या देशात जाणाऱ्या शिष्टमंडळात घाईघाईत लावण्यात आली. मूळ शिष्टमंडळात विधानसभा अध्यक्षांचे नाव नव्हते. परंतु इथं निर्णयाला वेळ करायचा आहे त्यासाठी विधानसभा अध्यक्षांना घानाला घेऊन गेलेत. ही आमच्या देशाच्या लोकशाहीची खिल्ली आहे. जागतिक मंचावर लोकशाहीचे किर्तन करण्यासाठी चाललेत. किती जणांना घाना माहित्येय? आधी इथला निर्णय द्या मग घानाला जा असं विधान संजय राऊतांनी नार्वेकरांच्या परदेश दौऱ्यावर केले.
दरम्यान, जो असेल तो निर्णय द्या, तुम्ही योग्य आहात अशी खात्री असेल तसा निर्णय द्या. जर निर्णय देत नसाल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही निर्णय देऊ शकत नाही तुम्ही फक्त वेळ काढताय. तुम्हाला अपात्र करायचे नसेल तर नका करू, तुम्हाला घटनाबाह्य सरकारला वाचवायचे आहे म्हणून वेळ काढताय म्हणून घानाला दौऱ्यावर जात आहेत असंही राऊतांनी म्हटलं.
...म्हणून शिवसेना फोडण्यात आली.
मराठी माणसाचा आवाज कमजोर व्हावा, मराठी माणसाच्या अस्मितेशी लढण्याची ताकद कमजोर व्हावी, स्वाभिमानाला धक्का बसावा यासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या पाठीत भाजपाने खंजीर खुपसला. शिवसेना फोडली त्याचे परिणाम असे महाराष्ट्रीयन लोकांना मुलुंड, मलबार इतकेच नाही परळ, लालबागला जागा द्यायचे नाही असं त्यांचे प्लॅनिंग आहे. आम्ही आंदोलन केली, यापुढे करत राहू परंतु हे आम्ही चालू देणार नाही असं संजय राऊत यांनी इशारा दिला.
मणिपूर हे सरकारचे अपयश
मणिपूरची स्थिती भयंकर आहे. सरकार, गृह विभाग, संरक्षण खाते सर्वांचे हे अपयश आहे. नवीन संसद भवन बनवले परंतु त्यात चर्चा करू दिली नाही. देशाला आग लावण्याचे षडयंत्र तर रचलं जात नाही ना? सरकार कोणत्याप्रकारे काम करतंय हे जनता पाहत आहे अशी टीका राऊतांनी केंद्र सरकारवर केली.