एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतच्या सरकारसोबतच्या बैठकीत बुधवारी मोठा राडा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच टकल्या, हेकन्या अशा शब्दांची सरबत्ती पहायला मिळाली. एसटी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करून संप मिटविला खरा पण त्याची चर्चा होण्याऐवजी टकल्या, हेकन्याचीच चर्चा होऊ लागली आहे.
कोल्हापूरचे श्रीरंग बरगे यांनी बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना गुणरत्न सदावर्तेंबरोबर झालेल्या शाब्दीक चकमकीचा किस्सा सांगितला. तसेच सदावर्तेनी घुशीसारखी कृती समितीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला. सदावर्तेंचा कृती समितीशी काही संबंध नसल्याचेही ते म्हणाले.
बैठकीत नेमके काय घडले? मूळ विषय वेतनवाढीचा बाजुला सारून सदावर्ते मध्येच भाषण करू लागले. मला ते नको होते. म्हणून मी हसलो. तर सदावर्तेंनी मला विचारले तेव्हा मी त्यांना मूळ विषय बोला असे सांगत भाषणापासून रोखले. यावेळी त्यांनी मला टकल्या म्हटले मग मी पण त्यांना हेकन्या म्हणालो. यावर सदावर्ते माझ्याकडे पुढे येत होते, मी त्यांच्या अंगावर धावून गेलो. मी कोल्हापूरच्या तालमीतला आहे त्याला घाबरणार नाही, असे बरगे यांनी सांगितले. यावेळी बरगे आणि सदावर्तेंना फडणवीस, शिंदेंनी आवरल्याचे कळते.
बरगे हे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटनिस आहेत. सदावर्तेने एसटी आंदोलनातही प्रसिद्धीसाठी घुसखोरी केली, मी त्याला बाप भेटलो, कोल्हापुरी पाणी काय असते ते त्यांना दाखवून दिले, असे बरगे म्हणाले.