मनोर/पालघर : संगणकीकरण करण्यासाठी अद्ययावत व्यवस्था, सॉफ्टवेअर व सर्व्हर उपलब्ध करून देणे व अन्य विविध मागण्यांसाठी अखेर १६ नोव्हेंबरला पालघर जिल्हयातील व राज्यातील तलाठी, मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. तत्पूर्वी ते ७ नोव्हेंबर ला पालघर तहसिलदार कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे धरणार आहेत.पालघर जिल्हयाची स्थापना झाल्यापासून तलाठी भरती न झाल्याने जिल्हयात १२४ पैकी ४४ सजांकरिता पूर्ण वेळ तलाठी नाहीत. तसेच ३४ मंडळ अधिकाऱ्यांपैकी १० पदे रिक्त आहेत. संघटनेने २६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाला निवेदन दिले होते. त्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त सजांचा कार्यभार नाकारून १५ आॅक्टोबरला तहसील कार्यालयात त्याच्या चाव्या जमा करून काम बंद केले तरी सुद्धा शासनाला जाग आली नाही. त्या अनुषंगाने संगणकीकरणाचे काम हे फक्त शासकीय कामाच्या वेळेत करण्यात येणार असून सुट्टीच्या दिवशी हे काम करण्यात येणार नाही. अतिरिक्त कार्यभार संदर्भात ७ नोव्हेंबर रोजी पालघर तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येईल. यामध्ये पालघर जिल्हयातील सर्व तलाठी मंडळअधिकारी सहभागी होणार आहेत. तरी सुद्धा शासनाला जाग येणार नसल्यामुळे १६ नोव्हेंबरपासून सर्व तलाठी, मंडळअधिकारी सामूहिक रजेवर जाणार अशी माहिती पालघरचे तलाठी नितीन सुर्ये यांनी लोकमतला माहिती दिली. (वार्ताहर)
तलाठी, मंडळ अधिकारी १६ नोव्हेंबरपासून रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 5:10 AM