डहाणू / मनोर : पालघर तालुक्यात तसेच जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघातर्फे बेमुदत संप आजपासून सुरू केल्यामुळे तलाठी कार्यालये बंद होती. त्यामुळे शेतकरी शाळकरी मुले ग्रामस्थांची तलाठी सजा अंतर्गत कागदपत्रासाठी प्रचंड हाल सुरू झाले आहेत.पालघर जिल्ह्यात एकूण १८४ तलाठी कार्यालय (सजा) आहेत त्यापैकी ४० रिक्त पदामुळे १४३ तलाठी व ३२ मंडळ अधिकारी आजपासून बेमुदत संपावर गेले. १) तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयचे भाडे देणे २) ७/१२ संगणकीकरण व ई-फेरफार मधील सॉफ्टवेअर दुरूस्ती सर्व्हरची स्पीड नेट कनिक्टीव्हीटी या अडचणी दूर करणे ३) तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे ४) अवैध गौण खनिज वसूलीच्या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, ५) तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालय बांधून देणे अशा विविध मागण्यांसाठी दि. ११ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर १६ एप्रिल निदर्शने करण्यात आली. २० एप्रिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले गेले. २१ एप्रिल रोजी संगणीकृत कामकाजावर बहिष्कार टाकला तरी सुद्धा शासनाला जाग आली नाही व एकही मागणी पूर्ण न केल्याने संघटनेने आज २६ एप्रिल २०१६ पासून बेमुदत संप पुकारला आहे.परिक्षा संपत आल्या असून त्यांना नवीन अॅडमीशनसाठी लागणारे व तलाठ्यांकडून मिळणारे कागदोपत्र आता घ्यायचे कुणाकडून हा प्रश्न पडला आहे. खरीप हंगामासाठी सोसायट्याकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आतापासूनच कागदोपत्राची जमवाजमव करावी लागते परंतु तलाठी कार्यालये बंद असल्यामुळे त्यांचीही मोठी पंचायत होणार आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव तरांगे, तालुकाध्यक्ष सी. रेखा म्हात्रे, चिटणीस हितेश राऊत, उपाध्यक्ष उज्वला पाटील, तेजल पाटील, अजीत शेलार, सदानंद भोईर, रत्नदिप दळवी, चुरी तसेच सर्व तलाठी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या संपाने विद्यार्थी, शेतकऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 4:21 AM