पूजा दामले, मुंबईटाल्कम पावडर अथवा बेबी पावडरमध्ये दुष्परिणाम करणारे घटक आहेत का? याची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. एफडीएने तीन दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाणे परिसरातून नामांकित कंपन्यांच्या पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. अमेरिकेमध्ये एका महिलेने बेबी पावडर वापरल्यामुळे अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप करत, कंपनीविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. या महिलेच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला, पण तरीही तेथील एफडीएने पावडरमुळे अंडाशयाचा कर्करोग होण्याचा संबंध आहे, हे मान्य केले नाही. या प्रकरणानंतर ‘भारतीय मानक ब्युरो’ने (बीआयएस) चार दिवसांपूर्वी टाल्कम पावडर आणि बेबी पावडर संदर्भात एक बैठक घेतली होती. त्यामध्ये देशात वापरल्या जाणाऱ्या पावडरविषयी चर्चा झाली. त्यानंतर, महाराष्ट्र एफडीएने टाल्कम पावडर, बेबी पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या नमुन्यांमध्ये नामांकित कंपन्यांच्या टाल्कम पावडरचा समावेश आहे. त्याचबरोबर, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कंपनीकडे माहिती मागवल्यावर भारतात विक्री होणारी पावडर ही भारतातच तयार होते, अमेरिकेशी त्याचा संबंध नाही आणि एका देशात उत्पादित केलेल्या पावडरची आयात-निर्यात होत नाही, असे उत्तर देण्यात आले.
एफडीएच्या रडारवर टाल्कम पावडर
By admin | Published: March 10, 2016 3:40 AM