तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण रस्त्यावरील माळवाडी येथे मंगळवारी दुपारी एसटी व कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांना जीव गमवावा लागला. तेहतीस प्रवासी जखमी झाले. काही कायमचे जायबंदी झाले. या अपघातामुळे तळेगाव-चाकण या २२ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी आणि आजूबाजूच्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेपासून धडा घेऊन दक्षतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत तळेगाव-चाकण मार्गाच्या दोन्ही बाजूंना तळेगाव शहराचा विस्तार माळवाडी गावापर्यंत वाढला आहे. परिसरातील मोठमोठ्या गृहप्रकल्पांमुळे लोकसंख्याही वाढली आहे. विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शेकडो विद्यार्थी शिकत आहेत. तसेच चाकण, शिक्रापूर व तळेगाव औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावरील अवजड वाहनांचे प्रमाण वाढले आहे. ट्रेलर, कंटेनर व मालट्रकच्या वाहतुकीमुळे हा रस्ता अतिशय धोक्याचा बनला आहे.तळेगाव स्टेशन चौकातील वाहतूककोंडी आता नित्याचीच झाली आहे. रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागणारी वाहतूककोंडी, त्यातच अपघातांमुळे विद्यार्थी व रहिवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तळेगाव स्टेशन ते खालुंब्रे गावापर्यंतच्या अंतरात १० वर्षांत अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेला आहे. या परिसरात सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याबाबत अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. मात्र, अद्याप त्याची ना गांभीर्याने दखल घेतली गेली ना अपेक्षित उपाययोजना झाली. तळेगाव स्टेशन या रहिवासी क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे वाढलेले अपघातांचे प्रमाण डोळ्यांत अंजन घालणारे आहे. (वार्ताहर)>अपघाताची कारणे : अपेक्षित उपाययोजनामाळवाडीतील दुर्घटनेमुळे प्रवाशांसह या परिसरातील रहिवाशांच्यासुद्धा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या भागातून अवजड वाहने, रासायनिक व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालणे आवश्यक बनले आहे.या महामार्गाला पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सध्याच्या मार्गाचे रुंदीकरण, शाळा, कॉलेज व लोकवस्तीच्या ठिकाणी सूचनाफलक, वेगनियंत्रक दिवे, झेब्रा पट्ट्यांचे गतिरोधक आदी सुरक्षिततेच्या तात्पुरत्या उपाययोजना तातडीने अमलात आणायला हव्यात. तळेगाव स्टेशन चौक ते सिंडिकेट बॅँक या मार्गावर सतत वाहतूककोंडी होते. तळेगाव दाभाडे-चाकण या मार्गाची रुंदी अगोदरच कमी आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठे खड्डे पडले आहेत. तळेगाव स्टेशन परिसर वगळता कोठेही दुभाजक नाही. त्यामुळे विरुद्ध दिशेची वाहने अनेकदा समोरासमोर येतात. त्यातून अपघात घडतात. दुभाजकाचे पट्टेही बुजले आहेत. त्यामुळे लेनकटिंग होते. या मार्गावरील इंदोरी बाह्यवळण आणि सुधा पूल या ठिकाणी वळण व तीव्र उतार आहे. त्यामुळे जड वाहनचालकांना नियंत्रण मिळविता येत नाही. त्यातून अपघाताच्या घटना घडतात. यासह सुधा पुलावरील कठडेही तुटलेले आहेत.या रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या दुर्घटना२७ आॅगस्ट २००९ रोजी माळवाडी येथे गॅस टॅँकरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत पाच वाहने खाक झाली होती. टॅँकरचालक व क्लीनरचा तर जागेवरच कोळसा झाला होता. पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर स्फोटामुळे हादरला होता. २४ आॅगस्ट २०१३ ला मोटार आणि ट्रेलरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी होते. १ जून २०१५ ला सुधा पुलावरील संरक्षक कठडे तोडून कंटेनर नदीत कोसळला होता. त्यामध्ये चालकाचा मृत्यू झाला होता. १६ आॅगस्ट २०१५ तळेगाव स्टेशनवरील रेल्वे पुलावरून कंटेनर कोसळता कोसळता वाचला. त्या वेळी मोठी दुर्घटना टळली होती.
तळेगाव-चाकण रस्ता धोकादायक
By admin | Published: September 22, 2016 2:15 AM