ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ९ : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सकाळपासून तळेगाव परीसरात तणाव असून हजारो लोकांचा जमाव जमला आहे. संतप्त जमावाने रस्तारोको केल्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेचा निषेद करताना नागरिकांचे आंदोलन तिव्र झाले असून, जमावाने पोलीसांवरचं हल्ला करण्यास सुरवात केली आहे.
पोलीसांच्या गाड्या उलट्या केल्या जात आहेत. तर एसटी बसेसचीही तोडफोड केली जात आहे. जमावाचा हा आक्रोश पाहून पोलीसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुरांचा वापर करुन जमावास पांगवण्याचा पर्यत्न करत आहेत. दरम्यान पोलिस आयुक्ता रविंद्र सिंगल यांनी नागरीकांना शांततेच आव्हान केले आहे. याप्रकरणी पोलीसांनी ५० जणांना ताब्यात घेतले आहे.
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तातडीने घटनास्थळी भेट दिली असून त्यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीवर चप्पल फेक करण्यात आली आणि नाशिक परीक्षेत्राचे डीआयजी विनय चौबे यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली.
याघटनेनंतर शहरासह जिल्ह्यात पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश देऊन पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तळेगाव घटनेप्रकरणी संबंधीत आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.
त्यामुळे नागरीकांनी शांतता बाळगावी असे आवाहन पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी दिले आहे. तर सदरच्या मुलीवर अत्याचार झाले नसून अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकिय अहवालाच्या आधारे स्पष्ट करून जमावाला शांत करण्याचे आवाहन केले आहे.
तळेगाव येथे काल सायंकाळी एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचे कळाल्यानंतर नाशिक शहरासर जिल्ह्यात ही वार्ता पसरली आणि ठिकठिकाणी जमाव जमू लागले. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेसह अन्य अनेक ठिकाणी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात पीडीत बालीकेला वैद्यकिय तपासणीसाठी आणण्यात आल्यानंतर तेथेही मोठा जमाव जमला.
दरम्यान सकाळी सात वाजेपासून तळेगाव येथे मोठा जमाव जमण्यास सुरूवात झाली. याठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याने सकाळी तातडीने नाशिकचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी सकाळी जिल्हा शासकिय रूग्णालयात पीडीत मुलीची भेट घेतल्यानंतर तळेगाव गाठले.
तेथे नागरीकांच्या रोेषामुळे त्यांची मोटार अडवून घेराव घालण्यात आला. त्यानंतर भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यावर रोष व्यक्त करीत त्यांच्या मोटारीवर चप्पलफेक करण्यात आली. तसेच नाशिकचे डीआयजी विनय चौबे यांच्या मोटारीवरही दगडफेक करण्यात आली.घटनास्थळी पोहचलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आरोपीविरूध्द पंधरा दिवसात दोषारोप पत्र दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अश्वासन आंदोलकांना ऐकवले.
दरम्यान, या घटनेनंतर शहराच्या विविध भागात अनेक चौकात युवकांचे जमाव जमत असून रास्ता रोकोचे प्रयत्न होत आहेत. तसेच दुपारी १२ वाजता नाशिक शहरातील व्दारका चौफुलीवर रास्ता रोको करण्यात येणार आहे.