मुंबई : दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. गेल्या चार (जानेवारी ते एप्रिल) महिन्यात मुंबई शहर व उपनगरांत करण्यात आलेल्या कारवाईत ८ हजार ७0३ तळीराम चालक आढळले असून, पश्चिम विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३९४ तळीराम चालकांवर कारवाई झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. दरवर्षी १५ हजारांपेक्षा जास्त चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना समज दिली जाते. पुन्हा गुन्हा घडल्यास लायसन्स रद्दही केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय गेल्या जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. मात्र त्याची अजून ठोस अशी अंमलबजावणी अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलीस लक्ष केंद्रित करीत आहेत. गेल्या चार महिन्यांत ८,७0३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक तळीराम चालक हे वांद्रे, सांताक्रूझ, डी.एन.नगर, बीकेसी, वाकोला, सहार या पश्चिम विभाग परिसरात आढळले आहेत. या विभागात जवळपास २,३९४ चालकांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या उत्तर परिमंडळातही करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार २८७ जण आढळले आहेत. यात दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक आहेत.
पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम
By admin | Published: June 13, 2016 5:30 AM