पुणे : थर्टी फर्स्टच्या रात्री ‘बेधुंद’ होऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल ३५८ तळीरामांचे नववर्ष पोलीस कोठडीत साजरे झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १०० ने वाढला आहे. बुधवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५ हजार २०० चालकांसह एकूण ८ हजार ७७२ वाहनचालकांवर वेगवेगळ्या कारवाई करुन ९ लाख १५ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.गेल्या वर्षी २५३ तर २०१३ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री १४७ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली होती. दरवर्षी हा आकडा वाढत चालला आहे. यंदा प्रथमच हॉटेल्स, क्लब यांना पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे तुलनेत रस्त्यांवरची गर्दी कमी होती. परंतु हॉटेल्समधून बाहेर पडल्यानंतर सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे वचक बसला. ८८ ब्रेथ अॅनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करून मद्यपी वाहनचालकांना अटक करण्यात आली. गुरुवारी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यासोबतच झेब्रा क्रॉसिंगच्या ५५२, काळ्या काचांच्या ५६६, लेन कटिंगच्या १५० तर ट्रिपल सीटच्या ४५ कारवाई केल्या. (प्रतिनिधी)असेही ‘लक्षवेधी’ नग!बेधुंद तळीरामांना पकडून वाहतूक पोलीस कार्यालयात नेण्यात येत होते. अशाच एका रिक्षाचालक तळीरामास वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याला घेऊन शिवाजीनगर वाहतूक पोलीस कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. वाहतूक पोलिसांचा ताफा पाहून त्याला अक्षरश: रडू कोसळले. मग काय मोबाईलमधील त्याच्या बायकोच्या फोटोकडे पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आजूबाजूचे त्याच्याकडे अभावितपणे तर कुणी केविलवाण्या नजरेने पाहत होतो. वाहतूक पोलिसांमध्ये मात्र हा नजारा पाहून हास्याचे फवारे फुटत होते. काही पोलिसांना त्याची दयाही येत होती. बायकोच्या फोटोकडे पाहत, मी पुन्हा दारू पिणार नाही, असे म्हणणारा तो मात्र सर्वांमध्ये लक्षवेधी ठरला.
तळीरामांचे नववर्ष कोठडीत
By admin | Published: January 02, 2015 12:56 AM