- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 2 - म्हादई पाणी तंटाप्रश्नी कर्नाटक सरकारशी चर्चा करण्याच्या मी विरोधात नाही. चर्चा करू पण पाणीप्रश्नी गोव्याच्या हितरक्षणाबाबत तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हादई पाणी तंटाप्रश्नी तोडगा निघावा म्हणून चर्चा करावी, अशी सूचना पाणी तंटा लवादाने केलेली आहे. चर्चेने तोडगा येत असेल तर बरेच आहे, असे लवादाचे म्हणणो आहे. त्या विषयी बोलताना मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, की गोव्याच्या हिताचे जर रक्षण होत असेल तर म्हादई नदीतील पाण्यावरून सुरू असलेल्या वादाविषयी चर्चा करता येईल. कर्नाटक व महाराष्ट्राशी चर्चा करण्यास माझी हरकत नाही.
दरम्यान, देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी हे पाणी तंटाप्रश्नी लवादासमोर गोव्याची बाजू मांडत आहेत. त्यांनी लोकमतला सांगितले, की गोव्यात सध्या वापरता येण्याजोगे पाणी म्हादई नदीत 109 ते 150 टीएमसी आहे. गोव्याची सध्याची गरज 9 टीएमसी आहे. आम्ही गोव्याच्या हिताबाबत तडजोड करू शकत नाही. तथापि, कर्नाटकशी चर्चा करता येईल.
लवादासमोर सुनावणी शुक्रवारीही सुरू राहिली. चेतन पंडीत हे गोव्याचे हायड्रोलॉजीविषयक साक्षीदार आहेत. त्यांचे म्हणणो प्रतिज्ञापत्रच्या रुपात येत्या 12 रोजी लवादासमोर मांडले जाणार आहे. गोवा व कर्नाटकने पाणी तंटय़ाशीनिगडीत अन्य विषयांबाबतही पुरावे सादर करावेत, असे लवादाने सूचविले आहे.