मुंबई : लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य कारणाने हल्ले होतात. गेल्या काही वर्षांपासून घडलेल्या अनेक घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक सुरक्षेच्या उपाययोजना केल्यानंतर आता आणीबाणीच्या परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकलच्या महिला डब्यात ‘टॉक बॅक’ प्रणाली बसविण्यात येत आहे. सध्या एका लोकलच्या महिला डब्यात ही प्रणाली बसविण्यात आली असून, त्याची चाचणी घेण्यात येत आहे. मात्र ही लोकल सेवेत दाखल झालेली नाही. प्रणालीचा खर्च हा जवळपास २५ लाख रुपये आहे. पश्चिम रेल्वेने महिलांच्या डब्यात ‘टॉक बॅक’ प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धावत असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आहे. (प्रतिनिधी)आत्पकालिन परिस्थितीत महिलांना थेट वाहन चालकाशी बोलता येईल यामध्ये प्रत्येक महिला डब्यातील दरवाजाजवळ बटण बसविण्यात येईल आणि ते बटण दाबताच तेथे असणाऱ्या छोट्या माईकद्वारे लोकलमधील मागच्या डब्यात असणाऱ्या गार्डशी संवाद साधता येईल. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत महिला प्रवासी गार्डशी संवाद साधू शकतील. दोन लोकलमधील महिला डब्यात ही प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर यातील एका डब्यात प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कामानंतर त्याची अंतर्गत चाचणीही घेण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर लोकल सेवेत दाखल होईल. तर दुसऱ्या लोकलमध्ये प्रणाली बसविण्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन्ही लोकल मार्चपर्यंत सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. महालक्ष्मी येथील कारशेडमध्ये यावर काम करतानाच चाचणीही घेतली जात आहे. उच्च न्यायालयाने महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध सूचना केल्या होत्या़ त्याअंतर्गत रेल्वे टॉक बॅकचा पर्याय महिला डब्यात उपलब्ध करून देणार आहे़
पश्चिम रेल्वे लोकलच्या महिला डब्यात टॉक बॅक प्रणाली
By admin | Published: March 01, 2017 1:45 AM