मुंबई - राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध बातम्या झळकत होत्या. या सर्व बातम्यांवर खुद्द अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत मी राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचसोबत भाजपात जाणार असल्याच्या चर्चा तथ्यहिन असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
'मी राष्ट्रवादीसोबत आणि यापुढेही पक्षातच राहणार', अजित पवारांकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम
अजित पवार हे विधिमंडळ कामकाजासाठी आज मुंबईत होते. यावेळी पक्षाचे आमदार त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले होते. तेव्हा आमदार शेखर निकम, आमदार अण्णा बनसोडे यांनी मतदारसंघातील विकास कामांबाबत मांडलेल्या प्रश्नाबाबत अजित पवारांना समस्या सांगितली. तेव्हा अजित पवार यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आमदारांच्या मतदारसंघात काही विकासकामांना स्थगिती दिली होती. त्याबाबत फडणवीसांची बोलावं अशी मागणी आमदारांनी केली. त्यानंतर आमदारांच्या कामांबाबत अजित पवारांनी फोनवरून फडणवीसांची चर्चा केली.
भाजपात जाण्याच्या चर्चांवर काय म्हणाले अजित पवार?कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
अजित पवार म्हणाले की, आपण सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवत आहात त्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. माझ्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचे दाखवले परंतु अशा सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत त्यामुळे या बातम्यांना कुठलाही आधार नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार संजय राऊतांवर संतापलेपक्षाच्या बाहेरचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे झाले आहेत त्यांना कुणी अधिकार दिला आहे कुणास ठाऊक... हे जेव्हा मविआची बैठक होईल तेव्हा विचारणार आहे असे स्पष्ट करतानाच तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात तर त्या पक्षाचे सांगा तुमच्या पक्षाचे मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून फलान झालं सांगू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचे वकीलपत्र दुसर्यांनी घेण्याची गरज नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आमची भूमिका मांडण्याकरता आमच्या पक्षाचा प्रवक्ता आणि नेते मजबूत आहेत अशा शब्दात अजित पवार यांनी संजय राऊतांना फटकारलं.