काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:05 AM2022-09-08T11:05:24+5:302022-09-08T11:09:29+5:30

गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर चव्हाण भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली.

Talk of Congress split; Thorat rushed in for damage control | काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

googlenewsNext

दीपक भातुसे -

मुंबई : काँग्रेसमधील एक गट भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क वाढवला असून, पक्ष एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी अशोक चव्हाण आणि नंतर विश्वजित कदम भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी थोरात पुढे सरसावले. 

गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर चव्हाण भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी पुढे येऊन चव्हाण काँग्रेसमध्येच राहणार असा खुलासा करीत काँग्रेस एकजूट असल्याचे सांगितले. तेवढ्यावरच न थांबता ते गणपती दर्शनाच्या निमित्ताने चव्हाण यांच्या घरी गेले आणि त्यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदमही भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर थोरात यांनी सांगलीला जाऊन विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली. ही भूमी काँग्रेस विचारांची आहे, विश्वजित यांचा उत्कर्ष काँग्रेसमध्येच होणार असून, ते इथेच राहणार आहेत. काँग्रेसचा विचार, नेतृत्व पुढे नेण्याची जबाबदारी विश्वजित यांच्यावर आहे, असा वडीलकीचा सल्ला थोरातांनी विश्वजित यांना सांगलीत जाऊन दिला. 

दोन दिवस भाजप प्रवेशाच्या चर्चेवर शांत असणाऱ्या विश्वजित कदम यांनी  थोरातांच्या भेटीनंतर जाहीर कार्यक्रमात याबाबत खुलासा केला. दोन दिवसांपासून माझ्याबाबत ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार आहेत, मी काँग्रेसमध्येच आहे. मी काँग्रेस सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे कदम यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसचे आमदार भाजपत जाणार या बातम्या कुठून येतात याचा शोध लावावा लागेल. काँग्रेस एकसंघ आहे, पक्षात फूट पडणार नाही.
- बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते

Web Title: Talk of Congress split; Thorat rushed in for damage control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.