मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून त्यादृष्टीने पश्चिम रेल्वेने महिला डब्यात ‘टॉकबॅक’ प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला. आणीबाणीच्या परिस्थितीत महिला प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी यासाठी एका लोकलच्या चार महिला डब्यांत टॉक बॅक यंत्रणा बसवण्यात आली. या यंत्रणेचे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी लोकार्पण करण्यात आले. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेनेही टॉकबॅक यंत्रणा बसवण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. लोकल प्रवासात महिला डब्यात महिला प्रवाशांवर चोरीच्या तसेच अन्य कारणास्तव हल्ले होत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. या घटना पाहता महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानंतर आपात्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी यादृष्टीने ‘टॉकबॅक’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. सध्या धावत असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आहे. लोकलच्या प्रत्येक महिला डब्यात टॉकबॅकचे चार युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टॉकबॅक प्रणालीअंतर्गत डब्यात उपलब्ध एक बटन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे बटण दाबताच लोकलच्या मागील बाजूस असलेल्या गार्डच्या कॅबमध्ये असलेल्या नियंत्रण पॅनलमध्ये आवाज जाईल आणि त्यानंतर गार्डला याची माहिती मिळताच प्रवासी गार्डशी संवाद साधेल. त्यानंतर पुढील स्थानकात महिला प्रवाशाला तत्काळ मदत पोहोचवली जाऊ शकते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य लोकलच्या महिला डब्यांतही यंत्रणा बसवण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. प्रणालीचा खर्च हा जवळपास २५ लाख रुपये आहे. एका बटणाद्वारे संवादडब्यात उपलब्ध एक बटण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे बटण दाबताच लोकलच्या मागील बाजूस असलेल्या गार्डच्या कॅबमध्ये असलेल्या नियंत्रण पॅनलमध्ये आवाज जाईल आणि त्यानंतर गार्डला याची माहिती मिळताच प्रवासी गार्डशी संवाद साधेल. मध्य रेल्वेही प्रयत्नशील : पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेही टॉकबॅक यंत्रणा बसवण्यास प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांना विचारले असता, मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सिमेन्स गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी थोडे फेरफार करावे लागतील. पश्चिम रेल्वेवरील नवीन बम्बार्डियर लोकल गाड्यांत टॉकबॅक यंत्रणा बसवणे सोपे आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
प.रे.मध्ये टॉकबॅक प्रणाली यंत्रणा
By admin | Published: March 09, 2017 1:59 AM