राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:56 IST2024-12-14T17:54:30+5:302024-12-14T17:56:01+5:30
नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...
Congress Nana Patole ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. तसंच काँग्रेसमधूनही पटोले यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, "राजकीय पक्षांमध्ये अशा गोष्टी होत राहतात. भाजपमधील लोक नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवरही आक्षेप घेत असतात. हे फक्त काँग्रेसमध्ये होतं, असं नाही, सर्वच पक्षात अशा गोष्टी होत राहतात. पक्षांतर्गत बाबी पक्षांतर्गत सोडवल्या जातात," असं पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलंय की, "ही जबाबदारी सर्वांची आहे. विषय श्रेयवादाचा नाही तर आत्मचिंतनाचा आहे. राज्यातील जनता बॅलेटवर मतदानाची मागणी करत आहे. या मुद्द्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमच्या मतावर निर्माण होणारे सरकार आम्हाला दिसलं पाहिजे, अशी जनतेची भावना आहे आणि ही लढाई आता आपण लढणं गरजेचं आहे," असं आवाहन पटोले यांनी पक्षातील लोकांना केलं आहे.
नाना पटोलेंनी पक्षाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी प्रचंड घसरल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा पटोले यांनी व्यक्त केली आहे. "मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करून मला पदातून मुक्त करावे," असे पटोलेंनी लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले.