लातूर - मराठवाड्यातील सर्वात उंच १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर शानदार सोहळ्यात शिक्षण तथा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी जिल्ह्यातील ११ हजार ५२० विद्यार्थ्यांनी भव्य मैदानावर तिरंगा साकारत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विक्रम काळे, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार, माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, वर्षा तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाकडे पाहून नागरिकांना सैन्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण होऊन त्यांच्या प्रती उत्तरदायित्वाची भावना जागृत होईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले. तर पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, हा मराठवाड्यातील सर्वात उंच ध्वज आहे. तो उभारण्यासाठी सर्व लातूरकरांचा सहभाग मोलाचा आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अगदी कमी वेळेत राष्ट्रध्वजाच्या उभारणीला मंजुरी मिळवून जलदगतीने काम पूर्ण केल्याबद्दल मंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री निलंगेकर व एका शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करून राष्ट्रध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील २० शाळांमधील व जिल्हा परिषद शाळांमधील हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज लातूरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 8:28 PM