रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानूप्रकाश तायल यांनी कोकण रेल्वे रसातळाला नेण्याचा सपाटा लावला आहे. त्याअंतर्गतच कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी २७ कोटी निधी उचलला. मात्र, त्यातून ज्या ठिकाणी घरांसाठी जागा घेतल्या त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या नाहीतच शिवाय ५० ते ६० लाख किमतीचे फ्लॅट्स सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना परवडणार कसे? जागाखरेदीही बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने करुन या घरबांधणी प्रकल्पात तायल यांनी नवे आदर्श घोटाळा प्रकरण निर्माण केले आहे, असा आरोप कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगीयांनी पत्रकारांशी बोलताना केला.संचालक मंडळाच्या सभेत कर्मचाऱ्यांसाठी घरे देणार असल्याचे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि २७ कोटी रुपयांचा निधी यासाठी उचलला. कर्मचाऱ्यांना घरे हवीत. त्यामुळे त्यांना कोणत्या विभागात हवी, याचा कानोसा घेऊन वा त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणे आवश्यक होते. खरेतर कर्मचाऱ्यांनीच घेतलेल्या जागेत घर उभारण्यासाठी त्यांना कर्ज देणे गरजेचे होते. परंतु आपल्या मनाप्रमाणे तायल आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी जागा खरेदी केल्या. २०११मध्ये उगवे, नवी मुंबई येथे ७५० चौरस मीटर, सालसेत - मडगाव येथे ५,५५० चौरस मीटर, सुरतकल मेंगलोरला १९ हजार ४० चौरस मीटर, तर जून २०१४मध्ये मिरजोळे येथे १३६० चौरस मीटर जागा खरेदी करण्यात आली. मात्र, ही जागा कर्मचाऱ्यांसाठी योग्य ठरेल की नाही, याचा कोणताही विचार केला गेला नाही, असा आरोप मळगी यांनीकेला.तसेच घेतलेल्या जागांचे दर हे बाजार मुल्याप्रमाणे कमी आहेत. असे असताना कागदोपत्री दाखवलेले हे त्याच्या दुप्पट आहेत. त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. एका कर्मचाऱ्याला ७५ लाखाला घर घेणे परवडणारे आहे का? हा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे हा नवीन आदर्श घोटाळा उघड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मळगी म्हणाले.हा घोटाळा कोकण रेल्वेतील महाघोटाळा असून तो उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असेही मळगी यांनी यावेळी सांगितले.े (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी २७ कोटी निधी उचलला.ज्या ठिकाणी घरांसाठी जागा घेतल्या त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या नाहीतच शिवाय ५० ते ६० लाख किमतीचे फ्लॅट्स आवाक्याबाहेरचे.जागाखरेदीही बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने.
तायल यांचा नवा ‘आदर्श घोटाळा’
By admin | Published: November 05, 2014 10:16 PM